
अपघात स्थळासह काक्रंबा, नळदुर्ग रस्ता, सिंदफळ जंक्शन, रिंग रोडवरील या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह जाऊन त्यांना योग्य त्या सूचना देऊन अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.
तुळजापूर-औसा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातासंबंधी जनरल मॅनेजर (तांत्रिक) तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नांदेड, तहसीलदार तुळजापूर, प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार व महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन चर्चा केली…
या महामार्गावर रिंग रोड येथील जंक्शनवर अपघाताच्या घटना वाढत आहेत. वळण रस्त्यावर गतिरोधक नसणे, दिशा दर्शक व सूचना फलकांचा अभाव, अपूर्ण कामे या तांत्रिक चुकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिनांक २ एप्रिल रोजी झालेल्या अपघातामध्ये एकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा घटना हृदयाला वेदना देणाऱ्या आहेत.
यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी दिनांक ३ एप्रिल रोजी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली. व महामार्ग पोलीस आणि महामार्ग अधिकार्यांसोबत चर्चा केली होती व प्रकल्प संचालकांना बैठक आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या अनुषंगाने अपघात स्थळासह काक्रंबा, नळदुर्ग रस्ता, सिंदफळ जंक्शन, रिंग रोडवरील या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह जाऊन त्यांना योग्य त्या सूचना देऊन अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.
तसेच तुळजापूर औसा महामार्गावरील रिंग रोड जंक्शनच्या ठिकाणी होत असलेले अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करून तात्काळ मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी गतिरोधक बसविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या असून सूचना फलक लावण्याचे निर्देशही दिले. बायपास वरील अपूर्ण व रखडलेली कामे दोन-तीन दिवसांत सुरु करण्यासह काक्रंबा गावातील पुलाचे काम देखील लवकरात-लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
रिंग रोड वरून नळदुर्ग रस्त्यावर वाहतुकीसाठी कोणतीही सुविधा करण्यात आलेली नव्हती. मूळ प्रकल्प अहवालामध्ये याचा समावेश नव्हता. याबाबत यापूर्वी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सिंदफळ येथील जंक्शनच्या ठिकाणी अनेक तांत्रिक चुका असून त्या लवकरात-लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.
लवकरच या सगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे नागरिकांना नाहक होणारा त्रास थांबेल व अपघात थांबतील…